इतिहासाचा धांडोळा घेताना भारत आणि ग्रीस
या दोन देशांमध्ये असलेले संबंध “इंडिका , पेरीप्लस ऑफ
इरिथ्रियन सी ” सारख्या इतिवृत्तांमधुन,पुढे जावुन सम्राट
अलेक्झांडर व पोरस यांच्या कथांमधुनही दिसुन येतात.भारतीय आणि ग्रीक पौराणिक
कथांमध्येही अनेकदा साम्य आढळते.हया दोन्ही देशांना प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे.
पाश्चात्य संस्कृतीचा अभ्यासा करताना तिचे बीज प्राचीन ग्रीक संस्कृतीमधे
अभ्यासकांना दिसुन येते.जसे आपल्याला रामायण,महाभारत ,कालिदास,भवभुती तसे ग्रीक
संस्कृती म्ह्णताच आठवतात ते होमरसारखा कवी, सॉक्रेटीस,
प्लेटो सारखे तत्त्वज्ञ, हिरोडोटस सारखा
इतिहासकार.
भौगोलीक दृष्ट्या वेगवेगळ्या ठिकाणी
राहणारा मानवी समाज एखादी विशिष्ट गोष्ट करताना एकसारख्या पद्धतीने विचार करतो असे
आढळुन आले आहे.त्याच्या त्यावेळी आसलेल्या भावभावना बहुधा एकाच प्रकारच्या
असाव्यात असेही दिसुन येते. आसपासच्या निसर्गातील आणि दैनंदिन जीवनातील घटनांचे कुतुहल
व भिती या दोन्हींमुळे,त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न
करताना माणसांने त्या घटनांसाठी देव वा देवता यांपैकी एका दैवी शक्तिस कारणभूत मानले.उदा.
समुद्राची समुद्रदेवता, नद्यांच्या देवता, वनदेवता, सूर्यदेवता, चंद्रदेवता.
ग्रीक पुराणकथांमध्ये यांसारख्या व इतरही अनेक देवता आहेत. अमरत्वा बरोबर
मिळलेल्या काही अमानवी शक्ती सोडल्यास या देवता माणसांपेक्षा अजिबात वेगळ्या
नाहीत. ज्यांच्यापुढे बिचारा माणूस सदैव अगतिक असतो अश्या काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ ह्या विकारांसह सर्व मानवी भावना त्या
व्यक्त करतात.
या ग्रीक देवदेवतांकडे न्यायबुद्धी, उदात्तता खरोखरच
फारशी दिसत नसली तरीही प्राचीन ग्रीसमध्ये लोकांची या देवतांवर श्रद्धा होती.होमरची
'इलिअड' व 'ओडिसी'
हि ग्रीक महाकाव्ये या पुराणकथांवर आधारीत आहेत. एस्किलस, सॉफोक्लिस, युरिपिडिस यांच्या नाटकांमध्येही या
पुराणकथांचे व देवतांचे संदर्भ येतात.फ्रॉइडसारख्या आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी
मनोगंडांना किंवा मनोविकारांना नार्सिसस मनोगंड, इडिपस गंड
यांसारखी नावे पुराणकथांमधल्या व्यक्तींवरुन दिली आहेत. ख्रिस्तपूर्व आठव्या
शतकातल्या अनेक मातीच्या भांड्यांवर या पुराणकथांवर आधारीत चित्रे रंगवलेली
मिळालेली आहेत.
माणसांवर दुनियेवर ऑलिंपस पर्वतावर
राहणारे हे सर्व देव बारीक लक्ष ठेवुन असतात. ऋग्वेदातला 'द्यौस्'शी साम्य असलेले ”झ्यूस” हे या
देवांच्या राजाचे नाव. तो क्रोनोस हया सर्व सृष्टीचा जो राजा आहे त्याचा
मुलगा.त्याच्या मरणानंतर झ्यूस स्वर्गाचा राजा झाला. हाच झ्यूस पुढे रोमन पुराणात
ज्युपिटर बनतो. झ्युस बाबत तो क्रीट देशाचा अतिशय शूर राजा होता आणि मरणानंतर त्याला
देवत्व मिळले असे काही विद्वानांचे मत आहे.त्याच्यात व भारतीय पुराणातल्या इंद्रामधे
सारखेपणा आहे. याची सत्ता आकाशावर व ढगांवर चालते. तो सुगीचा व पिकांचाही देव.
ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट हे त्याचं प्रतीक. राक्षसी गरुड पक्षी हा त्याचा
दूत आहे. काही ठिकाणी झ्यूसचे वास्तव्य पवित्र ओक वृक्षात मानले जात असे. त्याला
कौल लावून संदेश, आज्ञा घेतल्या जात असत. जग जिंकण्याची
महत्त्वाकांक्षा बाळगणारा अलेक्झांडरही युद्धापूर्वी झ्यूसला कौल लावत असे.जसे
एखादे ऋषी घोर तपश्चर्या करायला लागले की इंद्राचे सिंहासन डळमळीत होऊन त्याला भय
वाटुन तो पृथ्वीवर अप्सरा पाठवून त्या ऋषींची तपश्चर्या भंग पावण्याची तजवीज करतो
त्याप्रमाणे आपले सिंहासन अढळ राहावे
म्हणून झ्यूस काळजी घेत असतो. ऑलिंपसवर त्याच्यासाठी खेळाच्या स्पर्धा होत असत.
याच आद्य ऑलिंपिक स्पर्धा. झ्यूसची वेदी दगडी नव्हती. वर्षानुवर्षे त्याच्यापुढे
मेंढ्या व बैल बळी दिले जात असल्यामुळे ती राखेचीच बनलेली होती. तो कायदे व नीती
यांचं रक्षण करतो. आतिथ्य, अतिथी धर्म हे त्याचं ब्रीद. हा
धर्म न पाळणाऱ्यांना, अतिथी वा अनोळखी माणसांना त्रास
देणाऱ्यांना, खोटं बोलणाऱ्यांना, व्यापारात
फसवणाऱ्यांना तो शिक्षा करतो. त्याचं हत्यार म्हणजे दुधारी कुऱ्हाड असे.(परशुराम?)ग्रीक पुराणातल्या त्याच्या सगळ्याच शिक्षा महाक्रूर आहेत. त्यांची वर्णने
वाचून थरकाप होतो. त्यावरुन माणसांना जरब बसवण्यासाठी प्राचीन संस्कृतीत क्रूर
शिक्षा करीत असत असे दिसते. वास्तविक
पाहाता, या शिक्षा आपल्याला न्याय्य वाटत नाहीत.
प्रॉमीथिअसच्या कथेमधे पृथ्वीवर अग्नी
नाही म्हणून याने स्वर्गातून वा ऑलिंपस पर्वतावरून अग्नी चोरून आणला, म्हणून झ्यूसने त्याला भीषण शिक्षा दिली. त्याला खडकाला बांधले गेले आणि एक
गरुड पक्षी रोज त्याचे काळीज खात असे. रात्री पुन्हा ते काळीज नव्याने तयार होई
आणि सकाळी गरुड ते खायला येई. प्रॉमीथिअस अमर असल्यामुळे ही शिक्षा चिरंतन होती.
महाभारतातल्या अश्वत्थाम्याची आठवण व्हावी अशी ही कथा. प्रॉमीथिअसला त्याच्यासारखेच
जखमांचे व दुःखाचे अमरत्व मिळाले.राजा टॅन्टॅलसकडून झ्यूसचा व देवतांचा अपमान
झाला.म्हणुन त्याला तलावात उभे राहाण्याची शिक्षा झाली. त्याच्या डोक्यावर फळांनी
लगडलेल्या झाडाची फांदी होती.तहान लागल्यावर तो तलावातल्या
पाण्याला तोंड लावायला लागला की पाणी खाली जायचे. भूक लागल्यावर फळासाठी हात वा
तोंड पुढं केलं की त्या फांद्या बाजूला जायच्या. कॉरिन्थचा
राजा सिसिफसने लबाडी केली.त्याच्या लबाडीबद्दल त्यानं एक मोठा पाषाण डोंगरावर ढकलत
न्यायचा आणि तिथून खाली ढकलून द्यायचा.परत खाली यायचं आणि पुन्हा पुन्हा हेच काम
करायचं अशी शिक्षा झाली.
ऑलिंपसच्या स्वर्गात वा पृथ्वीवर सुंदर
स्त्री आढळली की ती झ्यूसचीच असते. इंद्राची कथा एका अहल्येशी निगडित आहे.
झ्यूसच्या मात्र अनेक कथा आहेत. सर्वात प्रसिद्ध म्हणजे टिंडारस राजाची राणी लेडा
हिची कथा. हिच्याकडे झ्यूस हंसाच्या रूपात गेला. त्यांच्या मिलनातून दोन अंडी
निर्माण झाली. त्यातून क्लायटेम्नेस्ट्रा व हेलन या दोन स्त्रिया निर्माण झाल्या.
यातील हेलनसाठी ट्रॉयचे प्रसिद्ध व
विनाशकारी युद्ध झाले.होमरच्या 'इलिअड'
या महाकाव्याची नायिका 'हेलन' असली तरी नायक मात्र तिचा नवरा मेनेलॉस वा प्रियकर पॅरीस नसुन त्या युद्धाच्या
अग्रभागी असलेला समुद्रदेवता थेटिसचा पुत्र “अकिलीस” हा शूर योद्धा आहे. या
वीराच्या जन्मानंतर थेटिसला एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला अपोलोने सांगितले,
की 'या नवजात बालकाला अपोलोच्या देवळामागच्या
तळ्यात बुचकळून वर काढ, म्हणजे त्याचा देह अभेद्य होईल.'
थेटिसने तसे केले. फक्त तिने त्याला पाण्यात बुचकळताना त्याच्या
टाचा धरल्या होत्या. साहजिकच टाचा वगळता त्याचे सर्व शरीर अभेद्य बनले. बाण,
भाले कशानेच त्याला जखम होत नसे. शेवटी पॅरीस आणि अपोलो यांनी
त्याच्या टाचेवर विषारी बाण मारले, तेव्हा तो मरण पावला(आपल्या कृष्णासारखेच).यामुळेच इंग्रजीत 'अकिलीसची टाच' Achilles' heel असे शब्द परिपूर्ण
असलेल्या गोष्टीतील अपुर्णता-मर्यादा-दुर्बलता सांगण्यासाठी वापरतात. अकिलीसला एक शाप
होता.जर त्याला पराक्रमी म्हणून कीर्ती मिळाली तर तो अल्पायुषी होईल आणि
दीर्घायुष्य हवे असेल तर आपले शौर्य गुंडाळून ठेवून निष्क्रिय आयुष्य त्याला जगायला
लागेल.त्याने निष्क्रियता नाकारुन पराक्रमी अल्पायुष्याची निवड केली.
नार्सिसस
हा देखणा तरुण होता. एकोचे त्याच्यावर प्रेम बसले; पण त्याने
प्रतिसाद दिला नाही. ती झुरत राहिली आणि तिची वाचा क्षीण झाली. ती फक्त ऐकलेल्या
शब्दांतले शेवटचे शब्द उच्चारू शकत असे. आजही ती प्रतिध्वनीच्या रूपात ऐकलेल्या
शब्दातले शेवटचे शब्द उच्चारत असते. पुढे एकदा नार्सिसस तळ्याकाठी बसला असता सहज
त्याने पाण्यात पाहिले. ते प्रतिबिंब आहे हे त्याला समजले नाही. तो त्या
पाण्यातल्या सुंदर तरुणाच्या प्रेमात पडला. त्याच्या सौंदर्याकडेच पाहात राहिला
आणि तिथून उठूच शकला नाही. झुरणीला लागला. अखेर त्याचे एका फुलात रूपांतर झाले. सिग्मंड
फ्रॉइडने स्वतःवरच्याच अतिरिक्त प्रेमात रमण्याच्या विकृतीला 'नार्सिसस गंड' असे नाव दिले आहे.
ओडिसी या महाकाव्यात ओडिसिअसने आपल्या
घरादाराची जबाबदारी 'मेन्टॉर'कडे
सोपवली होती. त्याने ती उत्तम प्रकारे पार पाडली. इंग्रजी भाषेत उत्तम प्रकारे
काळजी घेणाऱ्याला मेन्टॉर असाच शब्द आहे.ग्रीक पुराणात विचित्र आकाराचे देव व मानव
आहेत. सायक्लॉप्सला एकच डोळा व तो कपाळावर मध्यभागी असतो. जानसला दोन
विरुद्ध दिशांना असणारे दोन चेहरे आहेत. सेन्टॉरचे अर्धे शरीर मानवी व
अर्धे घोड्याचे आहे. मेंढपाळांचा देव पॅन याला मेंढ्याचे कान, पाय व शिंगे आहेत. तो अचानक प्रकट होऊन प्रवाशांना घाबरवून सोडायचा.
त्यातूनच इंग्रजीत अती घाबरणे याला 'पॅनिक' असा शब्द आला. हिप्नॉस हा झोपेचा देव. तो अधोलोकात राहातो आणि
त्याने कधी उजेड पाहिलेला नाही. त्याचे वर्णन अगदी काव्यमय आहे. तो तरुण आहे आणि
सर्वांना हवाहवासा असतो. त्याला पंख आहेत. थकलेल्या माणसांच्या कपाळावर तो
हळुवारपणे आपल्या हातातली डहाळी फिरवतो किंवा त्यांच्या पापण्यावर एका गुंगी
आणणाऱ्या द्रवाचे थेंब टाकतो. याचा पुत्र मॉर्फिअस हा स्वप्नांचा देव आहे. आजच्या
वैद्यकीय शास्त्रात वेदनाशमन व शांत करणाऱ्या औषधांना हिप्नॉटिक आणि मॉर्फिन असे
शब्द असणे हे सार्थच आहे.
क्रीटचा राजा मिनॉसने डेडॅलॉस आणि इकॅरस या
पिता-पुत्रांना डोंगरावर कैदेत टाकले. तेव्हा डेडॅलॉसने पक्ष्यांची गळलेली पिसे, पंख गोळा केले. त्यामधून मोठे पंख तयार करून ते स्वतःला व इकॅरसला मेणाने
चिकटवले. दोघे उडत तुरुंगाबाहेर पडले. डेडॅलॉस खाली जाण्यासाठी बजावत असूनही इकॅरस
आणखी वर वर उडत राहिला, अगदी सूर्याजवळ जाऊ लागला.
सूर्याच्या उष्णतेने मेण वितळले आणि इकॅरस समुद्रात पडून बुडून मरण पावला.
चॅरॉन हा
वृद्ध, दाढीधारी आणि थकलेला देव. तो स्टिक्स या नदीचा
नावाडी आहे (आपल्याकडच्या
वैतरणी नदी). मृतांच्या आत्म्यांना या स्टिक्स नदीपार करणे
हे त्याचे काम आहे. त्याच्या नावेचे शुल्क एक नाणे असते. अनेक संस्कृतीत व जमातींत
मृताच्या तोंडात नाणे ठेवण्याची पद्धत होती व काहींमध्ये आजही आहे. ते नाणे या
चॅरॉनसाठी असते.
अतिशय देखण्या 'टिथोनस'वर इओस म्हणजे उषादेवता अनुरक्त झाली
व तिने त्याला आपल्याबरोबर स्वर्गात नेले. त्याला अमरत्व दिले; पण दुर्दैवाने चिरतारुण्य द्यायचे मात्र राहून गेले. टिथोनस वृद्ध झाला
आणि कुरूप दिसू लागला. मरण्याची शक्ती असलेल्या धरणीवरच्या मानवांचा त्याला हेवा
वाटू लागला. त्याला मरण हवे होते, पण देवता आपले वरदान मागे
घेऊ शकत नाहीत. अखेर त्याचे रूपांतर नाकतोडा किड्यात झाले.
अपोलो सौंदर्य, संगीत, वैद्यक, धनुर्विद्या,
भविष्यकथन या सर्व गोष्टींचा देव.कसांन्ड्रा या ट्रॉयच्या
राजकन्येच्या सौंदर्याने भारावून गेला. त्याने तिला भविष्यकथनाची विद्या दिली;
पण कसान्ड्रा वश होत नाही म्हटल्यावर तिच्या भविष्यकथनावर कोणी विश्वास
ठेवणार नाही असा त्याने तिला शाप दिला.ट्रॉयच्या युद्धनंतर अॅगॅमेम्नॉनला घरी परत
जाऊ नकोस कारण, क्लायटेम्नेस्ट्रा तुझी व माझी हत्या करणार
आहे हे सांगतले होते. त्याने विश्वास ठेवला नाही. तिला आपल्याबरोबर नेले.
क्लायटेम्नेस्ट्राने त्या दोघांची हत्या केली.
“हेरॅक्लीस”हा साहसी
व शक्तिमान वीर. त्याला रोमन संस्कृतीत हर्क्युलीस म्हणतात. तो पाळण्यात असताना
त्याच्यावर हल्ला करणाऱ्या दोन सर्पांच्या मुंड्या त्याने मुरगळल्या. नऊ डोकी
असलेल्या हायड्रा नावाच्या सर्पाला त्याने ठार मारले. या नऊ डोक्यांपैकी मध्यावरचे
अमर होते. इतर डोक्यांपैकी कोणतेही कापले की त्याच्या जागी दुसरी दोन डोकी उगवायची; पण हेरॅक्लीस त्याला जाळण्यात यशस्वी झाला. काही काळ त्याने पृथ्वीचा भार
डोक्यावर घेतला होता.
पॅन्डोराला
दिलेली पेटी उघडायची नाही, अशी अट घातलेली होती.
बराच काळ संयम पाळुन पॅन्डोराने अखेर पेटी उघडलीच. त्याबरोबर आतील सुख, प्रेम, संपत्ती वगैरे सर्व भेटी बाहेर पडून निघून
गेल्या. तिने घाबरून पेटी बंद केली तेव्हा एकच भेट पेटीत शिल्लक राहिली होती. ती
म्हणजे आशा.
महाकवी होमर याच्या 'इलिअड' या महाकाव्यात 'ट्रॉय'च्या
युद्धाची कथा सांगितली आहे. अलौकिक सौंदर्यवती हेलन, महायोद्धा
अकिलीस, पॅट्रोक्लस, हेक्टर आणि
मेनेलॉस यातील प्रमुख पात्रे. मात्र हि कथा घडण्यास कारण ठरते ती प्रेमदेवता
अॅफ्रोडिटी किंवा व्हिनस.एकोणिसाव्या शतकात हाइनरिख श्लीमान या पुरातत्त्वज्ञाने
प्राचीन ट्रॉयच्या जागी उत्खनन केले आणि ऐतिहासिक ट्रॉय शहराचे वेगवेगळ्या काळातले
सात थर दिसून आले. म्हणजे या वैभवशाली शहरावर संपत्तीसाठी हल्ले होत होते आणि
त्याची संपत्ती इतकी होती, की उद्ध्वस्त होऊनही ते पुन्हा
पुन्हा वसवले जात होते. ट्रॉयचं युद्ध त्रिभुवनसुंदरी हेलनसाठी व हेलनमुळे घडलं अस
जरी मानलं तरी , दुसरे महत्वाचे कारण ट्रॉयच्या अफाट
संपत्तीसाठीही ते असणार. अकिलीसने सुरुवातीस लढायचं नाकारणं आणि युद्धात भाग
घेतल्यावर, मित्र पॅट्रोक्लस याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी
पराक्रम करून हेक्टरला ठार मारणं या यातील प्रमुख घटना आहेत. हेलन देवराज झ्यूस व राणी लेडा यांची कन्या. तिच्या अलौकिक सौंदर्यामुळे
कित्येक राजे तिला मागणी घालायला आले. पण ती कोणालाच स्वीकारत नव्हती. तेव्हा त्या
सर्वांनी तिला सांगितले, 'आमच्यापैकी एकाला निवड. बाकीचे
निघून जाऊ.' अखेर स्पार्टाचा राजा मेनेलॉसला तिने पसंत केले.
या इतर राजांनी परतून जाताना खिलाडूपणे सांगितले, की
भविष्यात त्या दोघांवर काही संकट आल्यास ते मदतीला येतील. हेलन-मेनेलॉसने सुखात
राहायला काही हरकत नव्हती.पण देवी अॅफ्रोडिटीच्या (प्रेमदेवता)
मनात तसे नव्हते.ऑलिंपसवरच्या एका देवतेच्या मेजवानीला तिने आयरिस नावाच्या भांडखोर
देवतेला बोलावले नव्हते. आयरिसने म्हणुन मेजवानीला
न येता मेजवानीच्या महालाच्या बाहेरून
खिडकीतून तिने एक सोन्याचे सफरचंद आत टाकले. 'अॅपल ऑफ
डिस्कॉर्ड!' त्याच्यावर लिहिले होते - 'सर्वाधिक सुंदर स्त्रीसाठी.' आता त्या महालातील
प्रत्येकच देवतेला वाटत होते, की तीच सफरचंद मिळण्यास पात्र
होती. पण तीन देवता सर्वांना पुरून उरल्या. त्या
म्हणजे झ्यूसची पत्नी हेरा, अथीना आणि अॅफ्रोडिटी. बाकी
सर्वजणी निघून गेल्या. या तिघींपैकी सफरचंद कोणाला मिळावे, असा
प्रश्न आला. तिघी झ्यूसकडे गेल्या; पण तो तरी कसा निवाडा
करणार? पत्नी हेराला सफरचंद द्यावे तर पक्षपातीपणाचा आरोप
येणार.त्याने पॅरिसल, जो ट्रॉयचा राजा प्रायॅमचा मुलगा होता, त्याची न्यायाधीश म्हणून निवड केली.पॅरिसच्या जन्मानंतर ज्योतिषांनी भविष्यवाणी
केली की हा मुलगा ट्रॉयचा सत्यानाश करणार. प्रायॅमने घाबरुन सेवकांना त्या बाळाला
जंगलात नेऊन मारून टाकायला सांगितले. ते बाळ बघून सेवकांची मने द्रवली. त्यांनी एक
मेंढी मारून तिच्या रक्ताने बाळाचे कपडे भिजवले आणि बाळाला मारल्याचा पुरावा
म्हणून प्रायॅमला दाखवले.त्या बाळाला एका धनगराने उचलून नेले आणि त्याला आपल्या
झोपडीत प्रेमाने वाढवले. त्याचे नाव पॅरिस ठेवले. पॅरिस अतिशय देखणा तरुण बनला.तो
रानात मेंढ्या चारायला गेला असताना त्याच्यासमोर हेरा, अथीना
आणि अॅफ्रोडिटी या तीन देवता उभ्या ठाकल्या. तो बावचळून गेला. देवींनी आपल्या
आगमनाचा हेतू सांगितला. त्याच्या हातात सफरचंद दिले व 'आमच्यापैकी
जी सर्वाधिक सुंदर वाटेल तिला हे दे,' असे सांगितले.तो
त्यांच्याकडे पाहातच राहिला. मग तिघींनी सफरचंदाच्या बदल्यात आपण काय देऊ ते
सांगितले.हेरा सफरचंदाच्या बदल्यात मोठे राज्य द्यायला तयार होती, तर अथीना विद्याकलांचे ज्ञान देणार होती. अॅफ्रोडिटीने सांगितले की
सफरचंदाच्या बदल्यात त्याला जगातली सर्वाधिक सुंदर स्त्री मिळेल. तरुण सुंदर
पॅरिसने सफरचंद अॅफ्रोडिटीला दिले. हेरा आणि अथीना क्रोधाने पाय आपटत निघून
गेल्या. अॅफ्रोडिटीने पॅरिसलात्याचे जन्मरहस्य सांगितले. 'तू
प्रायॅम राजाचा पुत्र आहेस, त्याच्याकडे जाऊन आपला अधिकार
मागून घे. त्याप्रमाणे पॅरिस प्रायॅमकडे गेला. त्याने पॅरिसला ठेवून
घेतले.राजपुत्राचे अधिकार दिले. अशाच अधिकारातून तो स्पार्टाला गेला. तिथे राजा
मेनेलॉस आणि राणी हेलनने त्याचे स्वागत केले. अॅफ्रोडिटीने आपले काम केले. हेलन
पॅरिसवर अनुरक्त झाली. पाहुणचार घेत असतानाच एके दिवशी पॅरिस हेलनला घेऊन ट्रॉयला
निघून गेला. मेनेलॉस हबकला. त्याचा वडील भाऊ अॅगॅमेम्नॉन संतापला. त्याने ट्रॉयला
विनंत्या, धमकावण्या, खलिते पाठवले.
मोठा भाऊ हेक्टर, राजा प्रायॅम सर्वांनी पॅरिसला समजावले पण
तो ऐकायला तयार नव्हता. अखेर अनेक जहाजे घेऊन अॅगॅमेम्नॉनने ट्रॉयच्या दिशेने कूच
केले. हेलनसाठी जे आले होते ते राजेही आपले वचन पाळून मदतीला धावून आले. हे युद्ध
दहा वर्षे चालले शेवटी पोकळ लाकडी घोड्यात
सैनिक बसवून तो नगरात घुसवला गेला. रात्री त्या सैनिकांनी बाहेर पडून ट्रॉय शहराची
राखरांगोळी केली.अॅफ्रोडिटीपुढे हेलेन आणि पॅरिस दोघेही
अगतिक आहेत.होमर हेलनला चंचल, व्यभिचारी स्त्री म्हणून रंगवत
नाही. तिला सर्व सामान्य स्त्रीप्रमाणे आपल्या घरादाराची आठवण येत असते.
पश्चात्ताप होत असतो.ट्रॉयचे युद्ध संपल्यावर मेनेलॉस हेलनला घेऊन स्पार्टाला गेला
आणि कोणतेही अग्निदिव्य वगैरे न करता हेलन पुन्हा स्पार्टाची राणी झाली. हेलनचे
व्यक्तिमत्त्व मात्र वेगळे आहे. ओडिसीच्या प्रारंभी होमर सांगतो की टेलेमॅकस
स्पार्टाला जातो आणि ओडिसिअसबद्दल चौकशी करतो. तेव्हा राणी हेलन त्याचे आदरातिथ्य
करते.
‘'इलिअड' व 'ओडिसी' ही दोन्ही काव्ये मौखिक आहेत.'इलिअड'चा खरा नायक आहे अकिलीस. अतिशय चपळ आणि
शूर अकिलीसवर ग्रीकांचा विजय अवलंबून होता. त्याचा मित्र पॅट्रोक्लस याला हेक्टरने
मारले, म्हणून अकिलीसने मोठा पराक्रम करून हेक्टरला ठार
केले. त्याचा देह रथाला बांधून रणभूमीवर फिरवला आणि स्वतःच्या तंबूत नेऊन ठेवला.
हेक्टरची नगरी, राजघराणे शोकात बुडून गेले. वृद्ध प्रायॅम
दुःखाने वेडा झाला; पण निदान पुत्रावर अंतिम संस्कार व्हावेत,
ही तळमळ त्याला लागून राहिली होती.तो स्वतः एकटा रात्री गुप्तपणे
अकिलीसच्या तंबूत गेला.अकिलीसने हेक्टरचा मृत देह परत दिला. त्याचे अंत्यसंस्कार
होईपर्यंत युद्ध बंद ठेवण्याची प्रायॅमची विनंती मान्य केली.
'ओडिसी' हे होमरचे दुसरे
महाकाव्य. ट्रॉयच्या दहा वर्षे चाललेल्या महायुद्धात ओडिसिअसने महत्त्वाची भूमिका
बजावली.सुप्रसिद्ध लाकडी घोडा तयार करण्याची कल्पनाही ओडिसिअसचीच होती.अकिलीसला
युद्धामधे भाग घेण्यासाठी ओडिसिअसने तयार केले होते.युद्धात पराक्रम गाजवला तर अकिलीस
अल्पायुषी होणार होता, म्हणून त्याची आई थेटिस त्याला जाऊ
देत नव्हती.अॅगॅमेम्नॉन बोलवायला येणार म्हणून अकिलीस स्त्रीवेषात अंतःपुरात जाऊन
लपला असावा असा ओडिसिअसचा अंदाज होता; पण त्याला शोधून बाहेर
कसे काढायचे? तेव्हा ओडिसिअसने स्त्रियांच्या वस्तू
विकणाऱ्याचा वेष घेतला आणि तो महालात गेला. त्याच्या विक्रीच्या वस्तूंमध्ये एक
तलवारही होती. स्त्रिया अलंकार उचलून पाहू लागल्या. एकच हात तलवारीवर पडला,
तो ओडिसिअसने घट्ट पकडला. तो अर्थातच अकिलीसचा हात होता. त्याला
युद्धासाठी जावेच लागले.
युद्ध संपल्यानंतर ओडिसिअस आपल्या इथाका राज्याकडे जायला
निघाला.पॉसिडॉन या समुद्रदेवाने 'ओडिसिअसला घरी पोचायला
दहा वर्षे लागतील आणि तो एकटाच पोचेल.' असा शाप दिला होता.या
प्रवासात त्याने इतके विलक्षण अनुभव घेतले की त्यामुळे आजही एखाद्या अती अवघड आणि
वैविध्यपूर्ण प्रवासाला ओडिसी म्हटले जाते.
प्रत्येक मुक्कामात त्याच्याबरोबरचे थोडे थोडे खलाशी मरण पावले.ओडिसिअसची
जहाजे,जि कमलफळे खाल्ल्यावर माणूस सर्व काही विसरतो अश्या कमलभक्षक
लोकांच्या बेटाजवळ गेली.ओडिसिअसला ही माहिती असल्याने त्याने सर्वांना वाचवले;
पण दोन खलाश्यांनी फळे खाल्ल्यामुळे ते सर्व काही विसरले.
एका बेटावर सायक्लॉप्स या कपाळावर व एकच डोळा असलेल्या
राक्षसाला आंधळे करून ते निसटले.एओलस या राजाने प्रतिकूल वाऱ्यांना जीमधे पकडून
ठेवलेले होते ती एक थैली ओडिसिअसला दिली.अनुकूल वाऱ्याबरोबर जात असताना काही
खलाश्यांना ती पैशांची थैली वाटून त्यांनी ती उघडली. प्रतिकूल वारे सुटले आणि
पुन्हा जहाजे भरकटली. एका बेटावर नरभक्षक टोळ्यांना काही खलाशी बळी पडले. सर्सी या
चेटकिणीच्या बेटावर तिने निम्म्या खलाशांना जादूने डुक्कर करून टाकले. ओडिसिअसला
हर्मिसने एक द्रव्य दिलेले असल्याने त्याच्यावर काही परिणाम झाला नाही, उलट त्याने तलवार उगारली. तेव्हा चकित होऊन ती त्याला शरण गेली व त्याच्या
प्रेमातच पडली. तिने सर्व खलाशांना पुन्हा मानव रूपात आणले. सर्वजण वर्षभर तिथे
मजेत राहिले. मग तिचा निरोप व सूचना घेऊन निघाले. वाटेत सायरन या गाणाऱ्या
राक्षसिणींचा खडकाळ प्रदेश होता. त्या गाण्याने मोहित होऊन प्रवासी तिकडे जात आणि
जहाज खडकावर आपटून मरून जात. म्हणून तिथे ओडिसिअसने खलाशांना त्यांच्या कानांत मेण
घालायला लावले. शिवाय त्याला स्वतःला खांबाला बांधून ठेवायला सांगितले. त्यामुळे
त्याने गाणे ऐकले; पण तो पुढे गेला नाही. एका ठिकाणी जहाज
सिला नावाचा सहा तोंडांचा राक्षस आणि चॅरिब्डिस हा समुद्रातला भोवरा यांच्यामध्ये
अडकले.सहा खलाशांचा बळी देऊन ते पुढे गेले. एकदा एका बेटावर जवळचे अन्न संपले
म्हणून कुरणात चरणाऱ्या मेंढ्या मारून खाल्ल्या आणि हेलिओस देवतेचा कोप ओढवून
घेतला. झ्यूसने वादळ निर्माण केले. ओडिसिअसला कॅलिप्सोच्या बेटावर आश्रय घ्यावा
लागला.
या प्रवासा ओडिसिअसने अधोलोकाला, मृतांच्या
प्रदेशाला भेट देणे व आत्म्यांना भेटणे हा यातील चमत्कृतिपुर्ण भागा. समोर
त्याच्या आईचा आत्मा दिसल्याने इथे त्याला धक्का बसला.त्याच्या दीर्घ वियोगाच्या
दुःखाने ती मरण पावली होती. तिच्याकडून त्याला पहिल्यांदाच इथाकाची हालहवाल कळली.
त्याची पत्नी पेनेलोपी एकनिष्ठपणे त्याची वाट पाहात होती; पण
अनेक राजे तिला मागणी घालायला जमले होते. त्यांना हाकलून लावणे तिला व तरुण मुलगा
टेलेमॅकस याला जमत नव्हते. ओडिसिअस अकिलीसच्या, अॅगॅमेम्नॉनच्या
आत्म्यांना भेटला. शिवाय त्याच्या एका खलाशाचा, एल्पिनॉरचा
आत्माही त्याला भेटला. त्याने सांगितले, की तो सर्सीच्या
बेटावर मेला होता. दारू पिऊन तो छपरावर गेला आणि खाली पडून मेला. त्याने विनंती
केली की त्याच्या शरीरावर अंत्यसंस्कार करावेत.
नंतर ओडिसिअस फेशिअन्सच्या राज्यात पोचतो. तिथली राजकन्या नॉसिका व
तिचा पिता यांनी त्याला मदत केली. अखेर तो एकटा सुरक्षितपणे इथाकाला पोचतो. तेथे पेनेलोपीसाठी
मुक्काम ठोकून बसलेल्या राजांना कसे हाकलायचे हा प्रश्न त्याच्या पुढे होता.
पेनेलोपीने त्यांना टोलवले होते. एकदा सांगितले होते, की
सासऱ्यासाठी शाल विणते आहे, ती विणून झाली की निर्णय घेते.
दिवसा विणलेली शाल रात्री उसवून ती दिवस काढत होती; पण ती
युक्ती त्यांना कळल्यावर पुन्हा त्यांचा तगादा सुरू झाला होता की दहा वर्षे झाली,
आता ओडिसिअस कसला परत येतो! तू आमच्यापैकी कोणाला तरी निवड.
त्यामुळे एकदम प्रकट न होता ओडिसिअस त्याच्या विश्वासू माळ्याच्या घरी थांबला.वेष
बदलून आलेल्या ओडिसिअसला त्याचा कुत्रा आर्गस याने ओळखाले व आनंदाने ओडिसिअसच्या
पायात घोटाळून प्राण सोडले. जणू ओडिसिअसला भेटण्यासाठी त्यानं प्राण धरून ठेवले
होते.अगदी पेनेलोपीनेही शंका आली असली तरी,त्याला ओळखले
नव्हते. त्याची दाई युरिक्लिया ,अतिथी
आला म्हणून त्याचे पाय धुवायला आली तेंव्हा त्याच्या पायावरची जुनी जखमेची खूण
तिला दिसली आणि तिनेही त्याला ओळखले. पण ओडिसिअसने तिला गप्प
केले. मग मुलगा टेलेमॅकस, पेनेलोपी व युरिक्लिया यांच्या
मदतीने त्याने एक योजना आखली. सर्व शस्त्रास्त्रे एकत्र गोळा केली. पेनेलोपीने जमलेल्या
राजांना कळवले की जो ओडिसिअसच्यासारखा कुऱ्हाडीच्या बारा दांड्यांमधून बाण मारू शकेल
त्याला ती स्वीकारेल.पण हा पण कोणालाच जिंकता आला नाही. ओडिसिअसने प्रकट होऊन बाण
तर मारलेच शिवाय त्याच बाणांनी शस्त्रास्त्रांनी बेसावध राजांना आपल्या मुलाच्या
मदतीने हरवले व राज्य संकटमुक्त केले.परंतु पेनेलोपीने
त्याला लगेच स्वीकारले नाही. त्याला भूतकाळातल्या खुणा विचारल्या, तो तोच ओडिसिअस आहे याची खात्री पटली, तेव्हाच तिने
त्याचा स्वीकार केला. पेनेलोपी एकनिष्ठपणे वीस वर्षे ओडिसिअसची वाट पाहात राहिली.
तिने जमलेल्या राजांना दाद दिली नाही; मूल्यव्यवस्थेतला हा
फरक लक्षणीय आहे.'ओडिसी'च्या शेवटी
राजांना मारताना ओडिसिअस फेमिअस या कवीकडे वळतो तेव्हा फेमिअस निडरपणे सांगतो,
'राजा, मला मारशील, तर
पस्तावशील. मी आहे कवी, देवतांची आणि श्रेष्ठ मानवांची गीते
गाणारा. त्यांना अमर करणारा.' ओडिसिअसने त्याला मारले नाही.
सॉफोक्लीस या श्रेष्ठ नाटककाराच्या लेखणीतून उतरलेली इडिपस ही
व्यक्तिरेखा 'आपलं सुख शहाणपणावर अवलंबून असतं, अहंकार संकटं निर्माण करतो' आणि 'पुढच्या क्षणाची शाश्वती कोणी देऊ नये' असे संदेश
देते.सॉफोक्लीस व युरिपिडिस हे एस्किलसनंतरचे दोघे श्रेष्ठ ग्रीक नाटककार. या पैकी
सॉफोक्लीस अधिक लोकप्रिय होता, असे दिसते. धार्मिक उत्सवातील
सर्वाधिक नाट्यस्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. युरिपिडिसची 'फेद्रा,' 'अॅन्ड्रोमॅकी,' 'मेडिआ'
ही नाटके प्रसिद्ध आहेत.सॉफोक्लीसने बहुधा १२३ नाटके लिहिली.त्यातली
आज फक्त सात उपलब्ध आहेत. त्यामध्ये 'इडिपसची त्रिनाट्यधारा'
आजही लोकप्रिय आहे. मानसशास्त्रज्ञ फ्रॉइडने 'इडिपस
गंड' या नावाचा सिद्धान्त मांडल्यामुळे हा शब्द परिचित झाला
आहे इडिपसची पुराणकथा विलक्षण आहे. 'इडिपस द किंग' हे त्रिधारेतलं पहिलं नाटक. थीब्जचा राजा लायस व राणी जोकास्टा यांचा
इडिपस हा मुलगा. त्याच्या जन्मानंतर असे भविष्य वर्तवले गेले, की तो बापाला मारेल आणि आईशी लग्न करेल. अशा भीषण वार्तिकामुळे राजा
लायसने त्याची टाच छेदली आणि त्याला निर्जन जागी सोडण्यासाठी नोकरांच्या हवाली
केले; पण नोकरांनी त्याला न मारता एका धनगराकडे दिले. तेथून
त्याला कॉरिंथला नेण्यात आले. राजा पॉलिबस व राणी मेरोपाने त्याचे संगोपन केले.
त्यांनाच तो आपले आई-वडील समजत होता. एके दिवशी त्याला स्वतःविषयी तेच भविष्य
ऐकायला मिळाले, म्हणून त्या भविष्यापासून दूर जाण्यासाठी
त्याने कॉरिंथ सोडले. भटकत असताना तो एका तिठ्यावर आला आणि गाडीतून चाललेल्या एका
वृद्ध माणसाबरोबरच्या जथ्याशी त्याची चकमक झाली. त्यात तो वृद्ध गृहस्थ जो थीब्जचा
राजा होता , त्याच्याकडून मारला गेला.पुढे त्याची गाठ
स्फिंक्सशी पडली. या अर्धसिंहमानवाच्या प्रश्नाचे उत्तर न देणाऱ्याला तो ठार मारीत
असे. त्यामुळे थीब्जसाठी हे संकटच होते. त्याचा प्रश्न होता - असा प्राणी कोण,
की जो सकाळी चार, दुपारी दोन व संध्याकाळी तीन
पायांवर चालतो? इडिपसने तोपर्यंत कोणालाही न सुचलेले उत्तर
दिले - 'माणूस. तो जीवनाच्या सकाळी चार पायांवर रांगतो,
दुपारी दोन पायांवर चालतो व म्हातारपणी काठीच्या तिसऱ्या पायाचा
आधार घेतो.' ते उत्तर ऐकून स्फिंक्स निघून गेला. इडिपसने
थीब्जचे स्फिंक्सपासून रक्षण केले, म्हणून लोकांनी त्याला
राजा केले आणि त्या काळच्या प्रथेप्रमाणे तिथल्या विधवा राणीशी त्याचा विवाह झाला.
त्याला दोन मुली व दोन मुलगे झाले. सर्व काही व्यवस्थित
असताना एके दिवशी थीब्जमध्ये प्लेगने माणसे मरू लागली. डेल्फीच्या देवळातून संदेश
मिळाला की राजा लायसचा मारेकरी पकडला गेला नाही, त्या
धार्मिक भ्रष्टाचारामुळे हे घडत आहे. इडिपसने प्रतिज्ञा केली की तो मारेकऱ्याला
शिक्षा करणारच. त्याने टायरेसिअस या अंध भविष्यवेत्त्याला(' ग्रीक संस्कृतीतील भविष्यवेत्त्यांना soothsayers किंवा
'seers' म्हणतात) विचारले, 'सांगा. तो
कोण आहे? टायरेसिअस प्रथम गप्प झाला. मग म्हणाला, 'मला भरीला घालू नको. पस्तावशील. सत्य उकरायला जाऊ नको.' पण इडिपस हट्टाला पेटला. टायरेसिअसने सांगितले, 'तो
पापी गुन्हेगार तूच आहेस.' इडिपस टायरेसिअसवर संतापला.परंतु कॉरिंथहून
आलेला दूत, जोकास्टाचे कथन, म्हातारा
धनगर या सर्वांच्या साक्षींतून इडिपसला कळते की बापाची हत्या व आईशी लग्न हे भयानक
पाप टाळण्यासाठी ज्यांच्यापासून तो दूर निघाला ते कॉरिंथचे राजाराणी त्याचे खरे
आईबाप नव्हतेच मुळी. उलट तो जिथे येऊन राजा होऊन स्थिर झाला तिथे त्याचे जन्मदाते
आई-बाप होते. त्याने तिठ्यावर ज्याची हत्या केली तो राजा लायस होता व तोच त्याचा
बाप होता. जिच्याशी लग्न करून त्याला चार मुले झाली ती जोकास्टा त्याची आई होती.
आपले पाप स्पष्टपणे समोर आल्यावर इडिपस म्हणतो, 'जे पाहू नये
ते मी पाहिले.' तो राणीच्या पिनेने आपले डोळे फोडून घेतो.
जोकास्टा फास लावून घेते. तिचा भाऊ क्रेऑन थीब्जचा राजा होतो. अंध राज्यहीन इडिपस
एकटा शहराबाहेर हाकलला जातो. त्याची मुले त्याला साथ देत नाहीत. फक्त इस्मेने आणि
अॅन्टिगनी या त्याच्या मुली त्याला आधार देतात.
इडिपसच्या पापात त्याची स्वतःची जबाबदारी किती? तो तर या पापापासून दूर पळण्यासाठीच थीब्जला आला होता. मग त्याला इतकी
शिक्षा कशी काय होते? या प्रश्नाचे उत्तर त्रिधारेच्या
दुसऱ्या नाटकात 'इडिपस अॅट कलोनस' मधे
मिळते. भटकणारा थकलाभागला इडिपस कलोनसला येतो. त्याला देवतांचा संकेत मिळतो की
जिथे त्याची अंत्यक्रिया होईल ते ठिकाण पवित्र होईल.हे कळल्यावर क्रेऑन इडिपसला
बोलवायला येतो. इडिपस तिकडे जात नाही. राजा थीसिअस त्याला आश्रय देतो. कारण
इडिपसचा मृत्यू हे त्याच्या राज्याला वरदान ठरणार असते. अपोलो व अथीना इडिपसला
पापमुक्त करतात. मरणाच्या वेळी पापमुक्त व शांत अश्या त्याचा आधीचा कडवटपणा लोपतो.
याच नाटकात 'भारतातले शुद्ध सोने' असा
उल्लेख ग्रीक वा भारत यांचा संबंध दाखवतो.
त्रिधारेचे शेवटचे नाटक 'अॅन्टिगनी'.क्रेऑनने तिच्या भावाची हत्या करुन तो देशद्रोही असल्यामुळे
त्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करायला बंदी केली आहे. अॅन्टिगनी मृतदेहावर
अंतिम क्रिया करते व मृत्युदंडाची शिक्षा स्वीकारायला तयार होते.क्रेऑनचा पुत्र
हेमनशी तिचा विवाह ठरलेला आहे.तो बापाला विरोध करतो व 'कुठलंच
राज्य एका माणसाची मालमत्ता नसते’ हे बजावतो.क्रेऑन
टायरेसिअसचंही ऐकत नाही.अखेर अॅन्टिगनीला एकाकी अंधाऱ्या गुहेत नेलं जातं. तिथे ती
आत्महत्या करते. हेमनही तलवारीने स्वतःची हत्या करतो. त्या शोकाने क्रेऑनची पत्नी
युरिडिसीही आत्महत्या करते.’'आपलं सुख शहाणपणावर अवलंबून
असतं. अहंकार संकटं निर्माण करतो. देवतांना त्यांची देणी द्यायलाच पाहिजेत’ हे भरतवाक्य कोरस बोलतात.
प्राचीन ग्रीक संस्कृतीतील अभिजात साहित्यामधे होमरच्या
महाकाव्यांच्या खालोखाल येते ती त्यातील 'ट्रॅजेडी' किंवा शोकात्मिका.ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात अथेन्समध्ये ग्रीक
पुराणकथांच्या पायावरच आधारित या वाङ्मयप्रकाराचा विकास झाला. डायोनिसस हा
द्राक्षांच्या पिकाचा व द्राक्षांची दारू तयार करण्याच्या विधींचा देव.त्याच्यासाठी
केल्याअजाणाऱ्या महोत्सवाच्या विधींतून या नाट्यप्रकाराची निर्मिती व विकास झाला.
त्या वेळी अथेन्समध्ये या नाटकांच्या स्पर्धा होत असत.स्पर्धेतले मुख्य विजेते
नाटककार म्हणजे एस्किलस, सॉफोक्लीस आणि युरिपिडिस.
एस्किलस योद्धाही होता आणि त्याच्या शौर्याबद्दल अथेन्सवासियांना
मोठा आदर होता. त्याची सातच नाटके आज उपलब्ध आहेत. ओरेस्टिया ही
त्याची त्रिनाट्यधारा पुराणकथेवरच आधारित आहे. या तीनपैकी पहिल्या नाटकाचे नाव
अॅगॅमेम्नॉन आहे. अॅगॅमेम्नॉन मेनेलॉसचा वडील भाऊ आहे. मेनेलॉसच्या राणीला,
हेलनला ट्रॉयच्या पॅरिस या राजपुत्राने पळवून नेले आणि ट्रॉय
धमक्यांना दादही देत नसल्यामुळे युद्ध अपरिहार्य झाले. अॅगॅमेम्नॉन ची लढाऊ जहाजे
कूच करत औलिसला पोचली; पण आर्टिमिस देवतेच्या कोपामुळे असे
वारे सुटले की ती पुढे जाऊ शकली नाहीत. काल्कास या ज्योतिष्याने सांगितले, की आर्टिमिसला अॅगॅमेम्नॉन ची मुलगी इफिजेनिया हिचा बळी द्यायला पाहिजे,
तर जहाजे पुढे जातील.इफिजेनियाचा बळी दिला गेल्याचे
क्लायटेम्नेस्ट्राला कळल्यापासून ती अत्यंत क्रुद्ध झाली होती. त्या संतापामुळे
तिने एजिस्थस या अॅगॅमेम्नॉनच्या चुलत भावाबरोबर संधान बांधले. एजिस्थसलाही
अॅगॅमेम्नॉनचा सूड घ्यायचा असल्यामुळे त्याने तिला साथ दिली. नाटकाच्या प्रारंभी
दिसते की ती अॅगॅमेम्नॉनची आतुरतेने वाट पाहते आहे. दूतांकडून तिला कळते, की दहा वर्षांचे युद्ध जिंकून तो कसांड्रा या ट्रॉयच्या राजकन्येला दासी
म्हणून घेऊन येत आहे. तो आल्यानंतर प्रथम तिने प्रेमाचे नाटकही केले; पण नंतर मात्र एजिस्थसच्या मदतीने त्याच्यावर घाव घालून त्याला ठार केले.
अतिशय प्रभावी भाषेत हे रक्तरंजित नाट्य सादर केले जाते. नाटकाच्या शेवटी कोरस
मात्र या दोघांना बजावतात, की अॅगॅमेम्नॉनचा मुलगा ओरेस्टीस
येऊन त्यांचा सूड घेईल.
दुसऱ्या 'द लायबेशन बेअरर्स' या नाटकात दिसते की क्लायटेम्नेस्ट्राला अत्यंत वाईट स्वप्ने पडत आहेत,
म्हणून तिने मुलगी इलेक्ट्रा व दासींना अॅमेम्नॉनच्या
थडग्यावर तीर्थ शिंपडण्यासाठी पाठवले आहे. थडग्यावर इलेक्ट्राला दोन केसांच्या बटा
दिसतात. ती ओळखते, की त्या ओरेस्टीसच्या आहेत, त्या त्यानेच खूण म्हणून ठेवलेल्या आहेत. त्याची आणि इलेक्ट्राची भेट
होते. ते दोघे आणि त्याचा चुलत भाऊ पिलेडीझ सूड घेण्याची योजना आखतात. दुसरे दिवशी
ओरेस्टीस आणि पिलेडीझ प्रवाशांच्या वेषात राजवाड्यात जाऊन सांगतात, की ओरेस्टीस मरण पावला आहे. क्लायटेम्नेस्ट्राला सुटकेचा आनंद होतो. ती
एजिस्थसला बोलावते, तेव्हा ओरेस्टीस त्याला ठार मारतो.
क्लायटेम्नेस्ट्रा ओरेस्टीसला जीवदानासाठी विनवणी करते, ओरेस्टीसच्या
मनाची चलबिचल होते; पण अखेर पित्याच्या हत्येचा सूड घेणे हे
कर्तव्य मानून तो आईची हत्या करतो. मात्र त्याच वेळी युमेनिडीज किंवा फ्यूरीज
त्याला घेरतात. या प्रायश्चित्त देणाऱ्या शक्ती किंवा देवता असतात. त्या त्याचा
अतीव छळ करत राहातात.
त्रिधारेच्या युमेनिडीज या तिसऱ्या नाटकात फ्यूरीजपुढे हताश
झालेला ओरेस्टीस अथीना या देवतेला शरण जातो.अथीना बारा व्यक्तींची ज्यूरी तयार
करते. त्यांच्यापुढे ओरेस्टीसचा खटला चालतो. ओरेस्टीसने रक्तासाठी रक्त ही अपोलोची
नीतीच पाळली असल्याने,अकारण व स्वार्थासाठी हत्या केली
नसल्याने अथीनाच्या मतामुळे तो निर्दोष ठरतो.अथीना फ्यूरीजना
शांत करते व सांगते की व्यक्तिगत पातळीवर सूड घेत राहाणे वा सूडचक्र चालू ठेवणे हा
न्याय असणार नाही.ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात एस्किलसने हिंसेचे चक्र थांबवून
न्यायप्रणालीची प्रस्थापना दाखवली आहे. कायद्यांच्या विकासात बुद्धीचा वापर
करण्याची आवश्यकता दाखवलेली आहे.
-- संकलक श्रीकान्त फाटक
संंदर्भ: सुप्रिया सहस्रबुद्धे यांचे ऐकलेली व्याख्याने व म.टा.मधिल लेख ,आंतरजालावरील उपलब्ध विविध स्रोत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा