गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

गणपती

गणपती, गणनायक ही नावेच गणराज्य संस्थेची प्रतिके आहेत. गणपती ही एका अर्थाने प्राचीन भारतीय व्यवस्थेमधील पद होते आणि त्या रक्षक देवतेची देवाघरापर्यत तसेच दारावरची द्वारपट्टी आणि कुठल्याही मंगल प्रसंगाची सुरवात हा प्रवास खरंच रोमांचकारी आहे.

गणेश ही देवता गजमुख म्हणजे हत्तीचे मुख पांघरून घेऊन रात्रीची प्रतिक आहे तर सुर्याला झाकून टाकते. गजांसुरांतक शिव आणि गणेश एकच आहे असे मत मुखर्जी (१९३२) यांनी आपल्या लेखात उल्लेख केला आहे. तर रामायणात शिवाचे एक नाव गणेश सालशंभुका आणि महागणेश असे आहेत. विष्णूला ही गणेश्वर असे बिरूद लावलेले दिसते.तर गाथासप्तशती मधील एका गाथेत गणपती ही गावाच्या वेशीबाहेर असलेली रक्षकदेवता आहे. म्हणजे ग्रामदेवता म्हणू शकतो.मनुस्मृतीत ही शूद्रांची देवता आहे.एकेकाळचे ब्रम्हणस्पती आणि इंद्र गणपती ही नंतरच्या काळातील विघ्नकर्ता कसे झाले? महाभारतात तसेच मानव्यगुह्यसुत्रात आदिम जमातीच्या प्रमुखांचा उल्लेख गणपती असा आहे. 

पुराणांमध्ये गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकरपार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. पुराण साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पुराण साहित्यात गणपतीच्या विविध नावांचा उल्लेख आहे. महाभारत या ग्रंथाचा गणपतीचा लेखक हा उल्लेख प्रक्षिप्त असावा. 

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक या शब्दाचे दोन अर्थ. वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो , याच अर्थाने गणाधिपती नावानेही ओळखला जातो. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय. वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला. दुसर्‍या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक सुळा मोडला. आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला. महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा व लंब वा लांबडे उदर (पोट) असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात. विघ्नराज वा विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपति असा आहे. म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपति व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस पुराणात विघ्नाधिपती हे नाम प्राप्त झाले. 

गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो. दोन ऋक मंत्र (गणानाम गणपतीम् हवामहे... व विषु सीदा गणपते. वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पती पासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप निर्माण झाल्याचे संशोधक मान्य करतात. 

ऋग्वैदिक बृहस्पती, ब्रह्मणस्पती, वाचस्पती ही देवता ज्योतिर्मय मानली जाई. तिचा वर्ण लालसर सोनेरी होता. अंकुश, कुर्‍हाड ही या देवतेची अस्रे होती. या देवतेच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाई. ही देवता कायम ‘गण’ नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व देवतांची रक्षकही मानली जाई. 

दुसर्‍या मतानुसार हस्तिदेवता व लम्बोदर यक्ष या भारतातील मूलनिवासी लोकदेवतांच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली.आदिम संस्कृतीतील उंदिर,हत्ती हि चिन्हे धारण करणार्‍या टोळ्यांमधिल हत्ती टोळीच्या विजयाचे प्रतिक उंदिर वाहन होण्यात झाले असावे. इसवीसनाच्या चौथ्या शतकातील कालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवीसनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता म्हणुन दिसत नाही. गुप्त काळापासूनच या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असे अभ्यासक मानतात.

विनायक रूप- मानवगृह्यसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये शाल, कटंकट, उष्मित, कुष्माण्ड राजपुत्र व देवयजन इत्यादीचा विनायक म्हणून उल्लेख आहे. महाभारतातील विनायक हाच आहे. याचे काम विघ्न उत्पादन करणे असे. पुढे हाच विघ्नकर्ता गणपती विघ्नहर्ता मानला जाऊ लागला. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक हा अम्बिकेचा पुत्र होय.गणेशाचा पार्वतीपुत्र उल्लेख येथेच प्रथम होतो.कार्तिकेयाचे अनेक गण वा पार्षदही पशुपक्ष्यांचे मुखधारित असतात. इसवीसनाच्या सहाव्या शतकातील 'भूमारा'त याप्रकारच्या अनेक गणांचा उल्लेख सापडतो. काही ठिकाणी गणेश व यक्ष/नागदेवता यांची वर्णने मिसळल्याचे दिसते. पुराणांमध्ये ह्त्तीमुखधारी यक्ष आहेत. गणपतीच्या ह्त्तीमुखाचे हेही कारण असावे.यक्ष हे गणपती प्रमाणे लंबोदर असतात. याज्ञवल्क्य संहिता' या ग्रंथात विनायक व गणपतीच्या पूजेचे विवरण सापडते. इसवी सनाच्या सातव्या शतकात रचलेल्या ललित माधव ग्रंथात गणपतीचा उल्लेख आहे. 

गणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथाच्या रचनाकाळात मतभेद आहेत. यांची रचना साधारणपणे इ.स. ११०० ते इ.स. १४०० मध्ये झाल्याचे मानले जाते. सामान्यपणे गणेश पुराण हा आधीचाव मुद्गल पुराण नंतरचा ग्रंथ मानतात. गणपती अथर्वशीर्षाची रचना इसवीसनाच्या सोळा ते सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या काळात झाली. महानुभाव साहित्यात प्रारंभ काळापासून गणेशाचे उल्लेख आहेत. मराठी भाषेमधील आद्य वाङमयकार असलेल्या महानुभाव पंथातील कवी नरेंद्र यांच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथात गणपतीचा  उल्लेख येतो. लोकसाहित्य व लोकसंस्कृती गणपती संतवाङमय व शास्त्रपुराणांबाहेर पडून लोकसंस्कृतीतही अनेक ठिकाणी आला आहे. तमाशातला प्रारंभीचा गण गणेशस्तवनाचा असतो. यात गणपती ऋद्धीसिद्धींसह नाचत येतो. लोकगीतामध्येही गणपतीचे वर्णन येते. कार्तिकेय गणपती भावांचा झगडा, शंकरपार्वतीचे बालकौतुक असे अनेक विषय यात आहेत.