मातृशक्तीची उपासना हे उद्दिष्ट असलेला ‘योगिनी संप्रदाय’ हा मध्ययुगीन काळातील एक महत्वाचा संप्रदाय. त्यांचा उपासना मार्ग हा सर्वसामान्य नसल्यामुळे योगिनी संप्रदाया बद्दल गूढरम्य व काही प्रमाणात भीतीची अशी संमिश्र भावना आढळते.
संपूर्ण भारतीय उपखंडात तसेच आग्नेय आशियात या संप्रदायाचे अस्तित्व होते.योगी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप हे योगिनी म्हणजेच योग साधनेतील प्रवीण स्त्री असे होते. चौसष्ट योगिनी मंदिर स्थापत्याच्या अस्तित्वामुळे या संप्रदायाकडे जगाचे लक्ष आकर्षित झाले.
ओदिशातील हिरापूर व राणीपूर अशी दोन व मध्य प्रदेशमधील खजुराहो व भेडाघाट येथील दोन अशी चार ठिकाणी असलेली चौसष्ट योगिनींची मंदिरे प्रसिद्ध आहेत व प्रामुख्याने आकर्षणाची केंद्रे ठरली आहेत. वर्तुळाकार विन्यास व चौसष्ट प्रकारच्या वेगवेगळ्या मातृदेवता व त्यांची वर्तुळाकार स्थापना हे या मंदिर स्थापत्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. मूर्तीशास्त्राचा विचार करता हिरापूर येथील योगिनी या वाहनावर उभ्या आहेत तर राणीपूर येथील नृत्य करताना दर्शविल्या आहेत. भेडाघाट येथील योगिनी या ललितासनात विराजमान आहेत. तरीही आपल्या रोजच्या देवींच्या तुलनेत येथील प्रत्येक देवीचे रूप हे निराळे आहे. येथील काही देवी या पशुमुखी असून प्रत्येकीची लांच्छनेही भिन्न आहेत. म्हणूनच मूळ समाजप्रवाहापेक्षा या भिन्न संप्रदायाचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरते.
मध्ययुगाच्या प्रारंभिक इसवी सनाच्या जवळपास सातव्या शतकात योगिनी संप्रदायाची स्थापना झाली असे अभ्यासक मानतात. योगी व योगिनी या दोन्ही संज्ञा हिंदू, बौद्ध तसेच जैन या तीनही धर्मामध्ये अर्थभाव बदलून वापरल्या जातात. याआधीच नमूद केल्या प्रमाणे प्रामुख्याने योग साधनेतील स्त्रीपुरुषां करिता या संज्ञांचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. परंतु कालपरत्वे शैव, शाक्त व तांत्रिक संप्रदायांच्या प्रभावामुळे योगिनी या स्त्री दर्शक संज्ञेची व्याख्या बदलल्याचे जाणवते. तांत्रिक संप्रदायाच्या अनुषंगाने अभूतपूर्व शक्ती असलेल्या स्त्रीला योगिनी असे संबोधले जाते. तर योग साधनेच्या बळावर ज्या स्त्रियांनी ज्ञान व शक्ती प्राप्त केली आहे, अशा स्त्रियांची गणनाही या गटात होते. तर योगिनी संप्रदायात योगिनी ही संज्ञा दोन अर्थाने वापरली जाते. पार्वतीच्या म्हणजेच आदिशक्तीच्या अंशात्मक रूपांना योगिनी मानले जाते तर तिच्या याच संप्रदायातील योगावर प्रभुत्व मिळविलेल्या स्त्री उपासिकांना योगिनी याच नावाने ओळखले जाते.
साहित्यिक व पुरातत्त्वीय पुराव्यांवरून योगिनी संप्रदायाचा प्रभाव सातव्या ते पंधराव्या शतकाच्या कालावधीत असल्याचे लक्षात येते.
मुळातच योगिनी संप्रदायहा शाक्त संप्रदायाचाभाग असून तांत्रिक साधना या संप्रदायाचा मूळ पिंड आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकानंतर भारतीय समाजात शाक्त संप्रदायाचे प्रस्थ वाढले. तत्कालीन शैव, बौद्ध यांनाही शाक्त संप्रदायाच्या प्रभावापासून वेगळे राहणे शक्य झाले नाही. म्हणूनच पुढील काळात शाक्त उपासना ही शैव व बौद्ध या तत्त्वज्ञानाचा महत्त्वपूर्ण भाग झाली. शाक्त संप्रदायामधे पुरुष व प्रकृतीच्या एकत्रित शक्तीला मानत असले तरी जगरहाटीच्या निर्मिती, पालन आणि लय या कार्यात देवीच अधिक कार्यशील असते अशी त्यांची ठाम श्रद्धा आहे. शाक्त संप्रदाय हा मुळातच देवी उपासकांचा आहे. त्यांच्या मूळ तत्त्वज्ञानानुसार शक्ती म्हणजेच देवी हीच सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच शाक्त संप्रदायात स्त्री ही उच्च मानली जाते तर पुरुषाला दुय्यम स्थान आहे. या संप्रदायाचा संबंध नेहमीच शैव संप्रदायाशी जोडला जातो. म्हणूनच शक्तीविना शिव हा शव ठरतो हे लक्षात घेतले पाहिजे व शिवशक्तीच्या मिलनातून विश्वनिर्मितीचे कार्य चालू होते, अशी ही धारणा आहे.
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसेच दैवी साधना ही देखील अश्याच दोन बाजूंच्या आखीवरेखीव समीकरणातून अस्तित्वात येते. भारतीय साधना प्रवाहातील कधी काळी समांतर गेलेल्या दोन बाजू म्हणजेच योग साधना आणि भोग साधना. योग साधनेत शरीरातील सुप्त अवस्थेतील कुंडलिनी शक्ती जागृत करून सहजानंदाची प्राप्ती केली जाते. नाथ संप्रदाय हा योगसाधनाप्रधान संप्रदाय आहे. तर तांत्रिक संप्रदाय हे भोग साधनेला प्राधान्य देतात. म्हणूनच योगिनी संप्रदायातही भोग साधनेतील पंचमकारांना प्राधान्य देण्यात आले आहे.
योगिनी संप्रदायाच्या केंद्रस्थानी दैवी शक्ती असलेल्या योगिनी कोण हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. योगिनी या संकल्पनेचा सर्वात प्राचीन उल्लेख नवव्या शतकातील अग्नि पुराणाच्या बावन्ना व्या अध्यायात सापडतो. नंतर मात्र योगिनींचे संदर्भ हे कालपरत्वे साहित्यानुसार बदलत जातात, असे लक्षात येते. ९ व्या ते १३ व्या शतकातील चतुर्वर्ग चिंतामणी, प्रतिष्ठा लक्षणसार, मायादीपिका या तत्कालीन ग्रंथांमध्ये योगिनी संप्रदायाचा व त्यांच्या साधनेचा उल्लेख येतो. शिव पौराणिक कथांमध्येही त्यांचा उल्लेख प्रामुख्याने आढळतो. तत्कालीन योगिनी तंत्र, माया तंत्र, कामाख्या तंत्र हे योगिनी पूजेचे महत्त्व विशद करतात. तर १० व्या शतकातील कालिका पुराणात अर्थ व काम यांच्या प्राप्तीसाठी चौसष्ट योगिनींची पूजा सांगितलेली आहे. स्कंद पुराणातील उल्लेखाप्रमाणे तांत्रिक शक्तीवरील त्यांचे प्रभुत्व हे त्या वाममार्गी असल्याचे दर्शवते. भयंकरी, यमदुती, नरभोजीनी,प्रेतवाहिनी ही त्यांची तांत्रिक साहित्यातील नावे त्यांचे भयावह रूपही स्पष्ट करते. तर महाभागवत पुराणानुसार योगिनी या मूळशक्तीच्या (देवीच्या) सेविका आहेत असे नमूद केलेले आहे तर चंडीपुराणानुसार त्या देवीच्या शरीर अंशातून उत्पन्न झालेल्या आहेत.या सर्व संदर्भानुसारचौसष्टयोगिनी या तंत्रमार्गी आहेत हे स्पष्टच आहे. प्राचीन साहित्यानुसार त्यांच्या संख्येत बदल होताना दिसतो. काही ठिकाणी चौसष्ट तर काही ठिकाणी एक्याएंशी योगिनी नमूद केलेल्या दिसतात .तसेच त्यांच्या नामाभिधानातही विविधता आढळते. असे असले तरी प्रामुख्याने बहुरूपा, तारा, नर्मदा, यमुना, शांती, वारुणी, क्षेमंकरी ऐंद्री, वाराही, रणवीरा, वानरमुखी, वैष्णवी, काळरात्री, वैद्यरूपा, चाचका, वेताळी, छिन्नमस्ता, वृषवाहना, ज्वाला, कामिनी, घटवारा, कारकाली, सरस्वती, विरूपा, कावेरी, भालुका, नारसिंही, वीरजा, विकटानना, महालक्ष्मी, कौमारी, महामाया, रती, करकरी, सर्पस्या, यक्षिणी, वैनायकी, विंध्यवासिनी, वीरकुमारी, माहेश्वरी, अंबिका, कामायिनी, घटवारी, स्तुती, काली, उमा, नारायणी, समुद्रा, ब्राह्मिणी, ज्वालामुखी, आग्नेयी, अदिती, चंद्रकांती, वायुवेगा, चामुंडा, मुरती, गंगा, धूम्रवती, गांधारी, सर्वमंगला, अजिता, सूर्यपुत्री, वायुवीणा, अघोरा, भद्रकाली यांचा समावेश होतो. योगिनी या शाक्त संप्रदायाच्या देवता. त्यांना आवरण देवता असे सुद्धा म्हटले जाते. त्यांना पार्वतीच्या सख्या मानले गेले आहे. योगिनीतंत्रात त्यांची उत्पती, त्यांची शक्ती आणि त्यांच्या कथा दिलेल्या आहेत. दैत्य निर्दालनासाठी दुर्गेने चौसष्टरूपे घेतली आणि त्यांच्या सर्वांच्या शक्तीनिशी दैत्याशी युद्ध केले आणि त्यात त्या दैत्याचा पराभव केला.
या योगिनींच्या उत्पत्तीविषयी अनेक संदर्भ हे पौराणिक तसेच संस्कृत साहित्यात सापडतात, त्यानुसार मूलत: त्यांचा संबध हा मातृकांशी जोडला जातो. भारतीय परंपरेत सप्तमातृका व अष्टमातृका या संकल्पना अस्तित्वात आहेत. प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर, शिल्पांमध्ये कडेवरती लहान मुलांना सोबत घेतलेल्या या मातृदेवता दिसून येतात. याच मातृकांना योगिनींच्या उत्पतीचे स्थान मानले जाते. या मातृका मुख्य शक्तीपासून निर्माण झाल्या असून त्यांच्यापासून ज्या प्रतिशक्ती निर्माण झाल्या त्यांनाच योगिनी मानले जाते. मार्कण्डेय पुराणानुसार मुख्य शक्तीच्या म्हणजेच आदिशक्तीच्या राग व कोपातून अष्टमातृका निर्माण झाल्या. याच अष्टमातृकांच्या प्रत्येकी आठ सेविका अशा मिळून चौसष्टयोगिनी तयार होतात. त्या संदर्भात मार्कंडेय पुराणात एक कथा आहे.या कथेनुसार आदिशक्तीचे कुंभ, निकुंभ व रक्तबीज या असुरांविरुद्ध युद्ध सुरू असताना काही केल्या रक्तबीजाचा मृत्यू होत नव्हता. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडताच त्यातून अनेक रक्तबीज तयार होऊन त्याला अमरत्व प्राप्त होत होते. त्यामुळे युद्धाला बराच काळ लोटूनही युद्ध निकालात निघेना. यामुळेच ब्रह्मा, विष्णू, शिव, कार्तिकेय, नरसिंह, वराह, इंद्र या देवतांनी आपल्या स्वत:च्या शक्ती स्त्री रूपात देवीच्या मदतीसाठी पाठवल्या, याच शक्ती म्हणजे सप्तमातृका तर देवीने स्वत: चामुंडा नामक एक शक्ती निर्माण केली अशा मिळून अष्टमातृका निर्माण झाल्या. याशिवाय शिव पुराणात अंधकासुराची गोष्ट आहे. या कथेनुसार अंधकासुरालाही अशाच स्वरूपाचे वरदान होते व त्याच्या वधासाठी सप्तमातृकांची निर्मिती झाली. तर इतर साहित्यात योगिनी या आदि शक्तीच्या विविध अवयवांपासून निर्माण झाल्या असाही संदर्भ मिळतो. तर अभ्यासकांच्या मतानुसार योगिनी उपासना ही लोकसंस्कृती, शाक्त व तंत्र यांच्या समीकरणातून अस्तित्वात आली.
योगिनींची मंदिरे ही बहुधा गावाच्या वेशीवर, एकांतात लोकवस्तीपासून दूर असतात. या देवींच्या उपासनेत इतर देवतांप्रमाणे सात्त्विक साहित्यांचा वापर न होता, तांत्रिक विधींच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश होत होता. योगिनी साधनेत तंत्रोपासनेवर भर दिला जातो म्हणूनच पंचमकार हे महत्त्वाचे ठरतात. पंचमकारांमध्ये मद्य, मांस, मत्स्य, मैथुन, मुद्रा यांचा समावेश होतो. साधकाला या पंचमकारांच्या साधनेतून ज्ञान व शक्ती मिळते. याशिवाय काही भयावह विधीही केले जातात, त्यात शवच्छेदनासारख्या विधीचा समावेश आहे. यात मानवी मृतदेहाचे शीर शरीरापासून विलग केले जाते. या विधीमागील हेतू मर्त्य जगातील सर्व प्रकारच्या मोहाचा त्याग सूचित करावयाचा असतो असे असले तरी हे विधी समाजमान्य नव्हते, किंबहुना याच अघोरी विधींच्या प्रस्थामुळे पंधराव्या शतका पर्यंत अस्तित्वात असलेला योगिनी संप्रदाय हा समाजातून अचानक नाहीसा झाला.
हिरापूर येथील मुख्य योगिनी ही आजही ग्रामदेवता म्हणून पुजली जाते. त्यावरुन योगिनी ही संकल्पना बहुधा ग्राम देवतांवरून अस्तित्वात आली असावी असे मानले जाते. अशाच स्वरूपाची संकल्पना कोकणातही पाहायला मिळते. कोकणातील मुख्य ग्राम देवतांची संकल्पना सात बहिणींच्या नात्याने प्रसिद्ध आहेत. या ग्रामदेवतांचाही संबंध सप्त मातृकांशी जोडला जातो.
नाथ संप्रदायातील स्त्रिया: नाथ संप्रदायात नाथ योगींबरोबरच नाथ योगिनींनाही खूप महत्त्व आहे. या संप्रदायात शिवाबरोबरच शक्तीची उपासनाही प्रचलित आहे. मत्स्येंद्रनाथ कौल-योगिनी संप्रदायाचेही प्रवर्तक मानले जातात. तसेच नाथ-योगींबरोबर अनेक नाथ-योगिनींचे संदर्भ ग्रंथ, आख्यायिका व शिल्प यांमधून दिसून येतात. नाथ संप्रदायाच्या गुरू-शिष्य परंपरेमध्ये आदिनाथ व गिरिजा यांच्यानंतर मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ व इतर नाथ-योगींची क्रमवारी पाहायला मिळते. या संप्रदायात चामुंडा, त्रिपुरासुंदरी, हिंगलजा, भैरवी, बालसुंदरी यांची पूजा प्रचलित आहे. मत्स्येंद्रनाथांच्या बऱ्याच प्रतिमा या शाक्त मंदिरां जवळ आढळून आलेल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील खुराची देवी मंदिरात त्यांची प्रतिमा गर्भगृहात कोरण्यात आलेली आहे. गोरक्षनाथांच्या मते, ‘शक्तियुक्त शिव’ हेच अंतिम सत्य आहे. हे शिवतत्त्व शक्तियुक्त आहे. परंतु शक्ती ही शिवाहून भिन्न नसून ती तदंतर्गतच आहे. नाथपंथीयांनी पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही योगसाधनेची दीक्षा दिली होती. एकंदरीत नाथ संप्रदायात शक्ती उपासनेचे महत्त्व दिसून येते.
नाथ संप्रदायाच्या उदयापासून अनेक स्त्रिया नाथ संप्रदायात दीक्षित झालेल्या दिसून येतात. मयनावती, गोरक्षशिष्या मुक्ताबाई, विमलादेवी, आउसा व निवृत्तिशिष्या मुक्ताबाई अश्या नाथ योगिनींची नावे सांगता येतील. शिवाय या संप्रदायात चौऱ्यांशी सिद्धांनाही महत्त्व असल्याकारणाने त्यात कनखला, मेखला, लक्ष्मींकारा व मनीभद्रा नावाच्या सिद्धिणी, नाथ संप्रदायाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या मानाव्या लागतील. कनखला व मेखला ह्या कानिफनाथांच्या शिष्या होत. नाथ संप्रदायातील काही तांत्रिक साधना नाथ-योगिनीं शिवाय पूर्ण मानल्या जात नाहीत.नाथ संप्रदायात विमलादेवी ही गोरक्षनाथांची प्रत्यक्ष शिष्या होती. नाथ संप्रदायातील बारा उपपंथांपैकी ‘आई’ पंथाची प्रवर्तक विमलादेवी समजली जाते. विमलामाईचा पंथ म्हणून हा ‘माईपंथ’ वा ‘आईपंथ’ म्हणून ओळखला जातो. या पंथाचे रोहतक व हरिद्वार येथे मठ आहेत. दाबिस्तानात आई पंथाचा उल्लेख येतो.
गोरक्षशिष्या मुक्ताबाईचे नाव नाथ संप्रदायात आदराने घेतले जाते. तिचा संदर्भ लीळाचरित्रात लीळा क्र.२२ व २४ (पूर्वार्ध) दरम्यान ‘मुगुताबाई’ असा आलेला आहे. महानुभावीय परंपरेत सुरक्षित असलेल्या संक्षिप्त चरित्रामुळे आद्य मुक्ताबाईच्या जीवनाविषयी महत्त्वाची माहिती मिळते. लीळाचरित्रानुसार मुक्ताबाई विदर्भातील एलिचपूरच्या राजाची कन्या होती व नंतर उज्जैनच्या विक्रमादित्याची राणी बनली. तिने आपला दीर भर्तृहरीपासून परमार्थ प्रेरणा प्राप्त केली होती. गोरक्षनाथांनी तिचे मूळचे ‘सत्यवंती’नाव बदलून ‘मुक्ताबाई’ असे नवीन सांप्रदायिक नाव तिला दिले होते. विरागी बनल्यावर ती श्रीशैलम पर्वतावर आश्रम उभारून योगसाधनेत मग्न झाली आणि योगिनी म्हणून तिची ख्यातीही झाली. महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर व तिची भेट श्रीशैलम पर्वतावर तिच्या आश्रमात झाली होती. तिचा उल्लेख तत्त्वसार व षट्स्थळ या ग्रंथांत चांगदेवाचा गुरू म्हणून आलेला आहे. विसा खेचर आपल्या षट्स्थळ ग्रंथात आपली गुरू-शिष्य परंपरा आदिनाथ,मत्स्येंद्र,गोरक्ष,मुक्ताबाई,चांगा वटेश्वर,विसोबा खेचर अशी सांगतात. विदर्भात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात सालबर्डीच्या डोंगरावर गोरक्षशिष्या मुक्ताबाईचे भव्य समाधीमंदिर आहे.
लीळाचरित्रातील मुक्ताबाई व ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाई ह्या भिन्न व्यक्ती सांगितल्या जातात. ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाई तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेल्या. या मुक्ताबाईला निवृत्तिनाथांनी नाथ संप्रदायाची दीक्षा दिली होती. रा. चिं. ढेरे यांच्या मते, चांगदेवाची मूळ गुरू गोरक्षशिष्या मुक्ताबाईच होती. परंतु ती दिवंगत झाल्यानंतर महाराष्ट्रात गाजत असलेल्या ज्ञानेश्वर मंडळातील बालयोगिनी मुक्ताबाईला त्यांनी गुरू म्हणून स्वीकारली असावी. आद्य मुक्ताबाईचा योगाचा संवाद त्यांना या द्वितीय मुक्ताबाईत आढळला आणि म्हणूनच त्यांनी तिचा सर्वभावे मुक्ताबाईचा पुनरावतार म्हणूनच स्वीकार केला.
ज्ञानदेवभगिनी मुक्ताबाईची गुरू-शिष्य परंपरा आदिनाथ-गोरक्षनाथ-गहिनीनाथ-निवृत्तिनाथ-मुक्ताबाई-चांगा वटेश्वर (चक्रपाणी)-विमलानंद-चांगा केशवदास-जनकराज-नृसिंह अशी आहे. मुक्ताबाईचा चांगा वटेश्वराशिवाय ‘चैतन्य’ नामक आणखी एक शिष्य असल्याचे सत्यमालनाथांनी सांगितले आहे.
बंगाल प्रांतातील गोविंदचंद्राची आई मैनावती ही जालंधरनाथांची शिष्या होती. तिने आपल्या पुत्रालादेखील नाथ संप्रदायात येण्याचे आवाहन केले होते. चक्रधरस्वामींची शिष्या ‘आउसा’ ही पूर्वी नाथपंथाची दीक्षित होती.दीक्षिताची कन्या : उपासनियाची सून : नाथपं-थी उपदेशु:’ असे तिचे वर्णन लीळाचरित्रात आले आहे. गोरक्षनाथांचा नामोच्चार करूनच ती भिक्षा मागत असे. या व्यतिरिक्त बहुडी योगिनीचा संदर्भ लीळाचरित्रातून प्राप्त होतो.
नाथ-योगिनींच शिल्प : महाराष्ट्रातील काही मंदिरांवर नाथ संप्रदायाच्या अनुषंगाने नाथ-योगिनींचे शिल्पांकन केल्याचे दिसून येते. काही नाथयोगिनी योगमुद्रेत साकारल्या आहेत. रत्नागिरी येथील पन्हाळेकाजी, बीड येथील कंकाळेश्वर मंदिर, ब्राह्मणी, दभोई व श्रीशैलम येथील वास्तूंवर नाथयोगिनींची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. ओडिशा राज्यातील मेघेश्वर मंदिरातील एका शिल्पात गोरक्षनाथांसमवेत काही योगिनीही दाखविल्या आहेत. त्यांना या प्रतिमांमध्ये दंड, कर्णकुंडले, यज्ञोपवित, योगपट्टा इ. समवेत दर्शविले गेले आहे.
हिरापूर येथील चौसष्ट योगिनी मंदिर वर्तुळाकार आहे. हे मंदिर इ.स.च्या नवव्या शतकात ब्रह्म राजवटीमधील हिरादेवीने बांधल्याचे सांगतात. उघडय़ा आकाशाखाली चौसष्ट कोनाडय़ांच्या रूपात असलेले हे मंदिर निश्चितच अत्यंत वेगळे आहे. वालुकाश्मापासून तयार केलेले हे वर्तुळाकार मंदिर खास वैशिष्टय़पूर्ण आहे. त्याच्या आतील बाजूला कोनाडे असून प्रत्येक कोनाडय़ामध्ये काळ्या रंगाच्या ग्रॅनाईट दगडात घडवलेल्या एकेका देवीची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली दिसते.मंदिराच्यामध्यवर्ती मनुष्याच्या डोक्यावर पाय दिलेल्या कालीदेवीची मूर्ती आहे. बुद्धीच्या मनावरील विजयाचे हे प्रतीक समजले जाते. तिथेच एक मध्यवर्ती चौथरा असून त्याला चंडी मंडप असे म्हणतात.
वामचार ही तंत्राची एक शाखा आहे.तर त्याची दुसरी शाखा आहे दक्षिणाचार. दक्षिणाचारात केवळ उपासनेचे अवडंबर असते; तर वामाचारात वामा म्हणजे स्त्री आवश्यक असते. त्यातस्त्रीसंभोगाला अतिशय महत्त्व असते. या तांत्रिक आचारविचाराच्या ग्रंथांना आगम म्हणतात.
याच्या उलट निगम. निगमात आपले वेद, पुराणे, इतिहास, उपनिषदे आदी येतात.
तंत्रवाद्यांचा प्रवाह प्रामुख्याने शैव आणि शाक्त म्हणून वावरतो. कालमुख, पाशुपत, कापालिक, लकुलिश, गामपत्य, सौर, शाक्त, भैरवनाथ हे सगळे तांत्रिकांचे संप्रदाय आहेत. काश्मीर, आसाम आणि दक्षिणेत श्रीशैल ही शैव तांत्रिकांची प्रमुख केंद्रे होती. कोणार्क आणिखजुराहो येथील शिल्प या तांत्रिक शैवांचे आहे.
बौद्ध धर्मातही हा तंत्रमार्ग प्रतिष्ठा पावलेला आहे. बौद्धांच्या महायान पंथाचा एक भाग योगाचार आहे. हा योगाचार पंथच नंतर तंत्रमार्गात रूपांतरीत झाला. या तांत्रिक बौद्धांना वज्रयान, मंत्रयान, सहजयान, कालचक्रयान अशी वेगवेगळी अवस्थानुसारी नावे आहेत.
योगिनी कौलमत हा या तांत्रिक संप्रदायातील एक प्रख्यात संप्रदाय आहे. त्रिक (अद्वैती) शैव परंपरेचा प्रवर्तक जो त्र्यंबक, त्याच्या त्र्यंबकमठिकेची एक शाखा कामरूपात प्रस्थापित झालेली होती. ही शाखा अर्धत्र्यंबकमठिका अथवा उत्तरत्र्यंबकमठिका म्हणून प्रसिद्ध आहे. तिचे प्रवर्तन त्र्यंबकाच्या दुहितपरंपरेतील मच्छंद अथवा मीन (मत्स्येंद्रनाथ) या सिद्धाने इसवी सनाच्या पाचव्या शतकात केले. या मठिकेशी निडित असणारा तांत्रिक संप्रदाय योगिनी कौलमत या नावाने ओळखला जातो. तर ही जी त्र्यंबकमठिका आहे, ती म्हणजे आपले महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर. येथून द्वैती, अद्वैती आणि द्वैताद्वैती शैव तांत्रिकांचे संप्रदाय उदय पावले. योगिनी कौलमत परंपरेतील पंधरावा पुरूष येथूच काश्मिरात गेला आणि त्याने तेथे प्रत्याभिज्ञा संप्रदायाचा प्रसार केला.
योगिनी कौलमताचा प्रवर्तक मच्छंद याच्या पत्नीचे नाव कुंकणांबा असे आहे. कुंकणा हे रेणुकेचे एक पर्यायनाम आहे. रेणुका अथवा कुंकणा देवीची उपासना दक्षिण भारतात, विशेषतः आंध्र, कर्नाटक, कोंकण आणि गोमांतकात वारूळ रूपात केली जाते. वारूळ हे भूमीच्या योनीचे प्रतिक आहे. कुंकणा ही ज्या प्रदेशाची अधिष्ठात्री देवी आहे, तो प्रदेश कौंकण अथवा कोंकण. कोंकणाचा आणि परशुरामाचा निकटचा संबंध आहे आणि परशुरामाची माता असे हे सर्व नाते आहे. असे एक चक्र पुरे होते.
शैव परंपरेतला सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ म्हणून अभिनव गुप्त याचे नाव घेतले जाते. हा दहाव्या शतकाच्या शेवटी काश्मिरात होऊन गेला. त्याने कामाचा जो अध्यात्मविचार मांडला आहे तो असा.जगात ज्याला आपण अनैतिक म्हणतो किंवा बीभत्स म्हणतो त्याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही. कोणतीही वस्तू अथवा क्रिया शुद्ध,अशुद्ध , नैतिक,अनैतिक होत असेल, तर ती हेतूमुळे होते.
आत्मा हा आनंदमय आहे. या आनंदाची प्राप्ती आणि या आनंदात विक्षांती हे जीवनाचे सर्वश्रेष्ठ साध्य म्हणजेच मोक्ष आहे. हा मोक्ष शांतस्वरूप असल्यामुळे अर्हभावरहीत मनाने रतिक्रीडा केली,तर त्या ठिकाणी मोक्षोपयोगी शांतरस आहे. रतिक्रीडेचा आनंद आणि मोक्षाचा आनंद यांची जात एकच आहे. अहंभाव आणि नीजत्व विसरल्यानंतर जो रतिभोग होतो तो मोक्षाचा मार्ग आहे. या साठी पतीने स्वतःला शिवस्वरूप समजावे आणि पत्नीला शक्तिस्वरूप. या दिव्य अवस्थेत जी रतिक्रीडा चालते, त्यातून श्रेष्ठ मानवाचा जन्म होतो.
रतिक्रीडेत असणारा आनंद अधिक उत्कट आणि मुक्त व्हायला हवा. हा मुक्त आनंद अडथळ्याचे निवारण झाल्याशिवाय व्यक्त होऊ शकत नाही. त्यासाठी त्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग मदिरा हा आहे. याला शैव परंपरेत शिवरस असे म्हणतात. ही दारू कशी प्यावी ? हे कुलार्णवतंत्रात सांगितले आहे -
पीत्वा पीत्वा पुनः पीत्वा यावत् पतति भूतले।
उत्थाय च पुनः पीत्वा पुनर्जन्म म विद्यते।।
आनन्दात् तृप्यते देवी, मूर्च्छनाद् भैरवः स्वयम्।
वमनात् सर्वदेवश्च तस्मात् त्रिविधमाचरत्।।
म्हणजे दारू पुन्हा पुन्हा प्यावी, पीता पीता जमिनीवर पडावे, उठल्यावर पुन्हा प्यावी म्हणजे पुनर्जन्म संपतो. दारू पिताना आनंदस्थानी देवी, मुर्च्छास्थानी भैरव आणि वमनस्थानी सर्व देवता संतुष्ट होतात. हिच्या गंधमात्राने पापनाश होतो, स्पर्शमात्राने पुण्य मिळते कारण हा शिवरस आनंदाची अभिव्यक्ती करणारा आहे.
तांत्रिक संप्रदायामध्ये मत्स्य, मांस, मदिरा, मुद्रा आणि मैथून या पंच ‘म'’कारांना खूप महत्त्व आहे. अभिनवगुप्त मात्र मकार तीन मानतात.
अभिनव गुप्तांनंतर सतराव्याअठराव्या शतकातील महाराष्ट्र,कर्नाटक,तामिळनाडू या दक्षिण प्रदेशात भास्करराय अथवा भासुरानंदनाथ ह्या कौल तांत्रिकांचे नाव
येते. अनेक ज्ञानशाखांवर त्यांचा अधिकार होता. त्यांनी अनेक यज्ञ केले, मंदिरे उभारली, काशी ते रामेश्वर विजययात्रा केली. अनेक शिष्य तयार केले. महाराष्ट्रातील चंद्रसेन जाधव त्यांचे अनुयायी होते असा उल्लेख मिळतो .तंजावरच्या मराठी राज्यकर्त्यांनीही त्यांचा सत्कार केला होता. "नित्योत्सव” ग्रंथाचा कर्ता उमानंदनाथ; तसेच मराठवाड्यातील देशिकानंद, शुकानंद हे त्याचे शिष्य महाराष्ट्रीयच होते. त्यांचे उमरी, वसमत, कहाळे येथील मठ भास्कररायांच्या परंपरेतील होते.
सहजिया वैष्णव संप्रदाय हासुद्धा बौद्धांच्या वज्रयान,सहजयान या तांत्रिक संप्रदायांच्या प्रभावातून उद्भूत झालेला आहे. या सहजिया वैष्णव संप्रदायाचे चंडिदास, चैतन्य गौरांग प्रभू हे अनुयायी होते. विशेष म्हणजे गौडिय वैष्णव आजही वैष्णवींशी तसलेच संबंध राखूनआहेत. तर या चैतन्यांच्या अनुयायांनी मधुरभावाचे पीक अमाप पिकविले.गुजरातमधील वल्लभ नावाच्या साधूंचा पुष्टीसंप्रदाय असाच आहे. वल्लभ साधू स्वतःस कृष्ण समजत आणि बायका स्वतःस राधा समजून सर्वतऱ्हेच्या क्रीडा ते करत.
या तांत्रिक आचार-विचाराचे जे ग्रंथ आहेत, त्यांत ‘भगमालिनी रजस्वला स्तोत्र’ (यात रजस्वलेच्या सर्जनेंद्रियाच्या पूजेचे महत्त्व गायलेले आहे.),’सौभाग्यभास्कर’ (कौलमत भाष्यकार भास्करराय हे या ग्रंथाचे लेखक), तसेच ‘कौलज्ञाननिर्णय’, मच्छंद वा मच्छेंद्रनाथांचे ‘कुलार्णवतंत्र’ यांचा समावेश होतो. गोरक्षनाथांचे गुरू मच्छेंद्रनाथ वा मत्स्येंद्रनाथ आणि कुलार्णवतंत्राचे लेखक वेगळे अन् बरेच उत्तरकालीन आहेत. पण गंमतीचा भाग म्हणजे गोरक्षनाथांचे गुरू मच्छेंद्रनाथसुद्धा
स्त्रीराज्यात म्हणजे तांत्रिक योगिनींच्या जाळ्यात अडकले होते, अशीही कथा आहे.
असा हा कामाचा अध्यात्मविचार चौथ्यापाचव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत भारतात मोठ्या प्रमाणावर सुरू असतानाच दुसरीकडे भक्तिसंप्रादायातील कृष्ण भक्त संत मीराबाईंचे नाव येते. ज्या स्वतःला राधा समजून कृष्णाची भक्ती करीत व त्यालाच आपला पती मानीत होत्या. त्यांच्या भक्तीला सासरच्यांचा तीव्र विरोध होता व त्यांनी मीराबाईंवर एकदा वीषप्रयोग केला होता असा उल्लेख
लोककथांमधे येतो.
कृष्णाच्या भक्तांनीच हा मार्ग अवलंबिला होता, असेही नव्हे. रामाच्या उपासकांनी अशाच ‘रसिक संप्रदाया’ची स्थापना केली होती.
संदर्भ : मराठी विश्वकोष
व आंतरजालावरील उपल्ब्ध साहित्य.
श्रीकान्त फाटक
योगिनींच्या उपासनामार्गाचा पसारा फार विस्तृत आहे तरी आपण तो अतिशय सुसंबध्दरीतीने विस्तारला आहे , सावरला आहे आणि आवरलाही आहे ..खूप छान लेख ..विशेषकरून नाथसंप्रदायातील योगिनींची परंपरा स्पष्ट झाली ..अनेक धन्यवाद !
उत्तर द्याहटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाखूपच मस्त लिहिलं आहे धन्यवाद
उत्तर द्याहटवाचौसष्ठ योगिनी मध्ये जी अदिती आहे तिच माहूरची रेणुका माता आहे ना,समर्थ रामदास यांनी आरती मध्ये लिहिले आहेकी,"द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो, सकलामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो"
उत्तर द्याहटवापण माहूर रेणुका तर स्वतः आदी शक्ती स्वरुपिणि आहे न